जगणे सुंदर करण्यासाठी आनंदवाटा शोधा – राजेंद्र घावटे
जुनी सांगवी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “जेष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती आहे. वयाबरोबरच अनेक बऱ्यावाईट अनुभवांची शिदोरी त्यांच्या सोबत असते. सुख आणि दुःखाच्या अनुभवातून मिळालेल्या अनुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन पुढच्या पिढ्यांना दिशा देण्याचे काम जेष्ठांनी करावे. कुटुंब आणि समाजासाठी त्यांनी दीपस्तंभ बनावे. आनंदाच्या नवनवीन वाटा शोधून आपाल्या सभोवती चैतन्य निर्माण करत निरामय आयुष्य जगावे. ” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते आणि लेखक राजेंद्र घावटे यांनी केले.
सांगवी येथील अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात “जगणे सुंदर आहे” या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे हे होते. संघाचे अध्यक्ष रवींद्र निंबाळकर, बबनराव शितोळे, विलास हिंगे, सचिव भानुदास भोरे, दीपक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विलास भावसार यांचा विशेष सन्मान करण्यात आला .
ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सदस्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, ” भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्वाचा आहे. आयुष्य हा ऊनपावसाचा, आशा निराशेचा प्रवास आहे. आयुष्यात येणारी संकटे, अडीअडचणी, नैराश्य, दुःख, सुख, आनंद या सर्व गोष्टीमुळे जगण्याची चव वाढते. दुःखाने माणूस डोळस बनतो. ज्ञान, प्रज्ञा, व्यासंग आणि सत्संग यामुळे आयुष्याला उजाळा मिळून समृद्धीकडे वाटचाल करता येते. जीवनातील प्रत्येक क्षण जपता आला पाहिजे. मृत्यू हे आयुष्याचे अंतिम आणि अटळ सत्य आहे. त्याची भीती न बाळगता दिलेल्या आयुष्यात स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेवा हा धर्म मानत आंधळ्याचा डोळा, पांगळ्याचा पाय आणि अनाथांचा नाथ होता आले पाहिजे. निसर्गाचा संग, अध्यात्म, पर्यटन, कौटुंबिक जिव्हाळा, विविध छंद, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आदींसाठी केलेले काम यातून आयुष्य जगताना उत्तम अनुभूती मिळते. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी स्वतः सकारात्मक राहून मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करतात आला पाहिजे.” असे सांगताना घावटे यांनी अनेक दाखले दिले.
संघाचे आधारस्तंभ प्रशांत शितोळे म्हणाले की, “जग झपाट्याने बदलत आहे. भौतिक सुविधा वाढल्या आहेत. समाजमाध्यमे आपल्याला जोडतात. परंतु माणसा माणसातील अंतर वाढत आहे. जेष्ठ नागरिक हे संघाच्या माध्यमातून एकत्र येतात ही चांगली गोष्ट आहे. आपल्यामध्ये दडलेल्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करावे. जेष्ठांनी एकत्र येऊन आयुष्याचा आनंद लुटावा..”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र निंबाळकर यांनी केले तर सूत्रसंचालन भानुदास भोरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन विलास कांबळे, विठ्ठल नंदनवार, अशोक भंगाळे आदींनी केले.