Spread the love

*पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित*
🕉️ *शिवदर्शन -भाग १*🕉️
*लेखन- सौ. माधुरी शिवाजी विधाटे, पुणे*
*हंपी ,एक वैभवशाली शिल्पनगरी*
*पाताळेश्र्वर शिवमंदिर आणि बडवी शिवमंदिर,हंपी*
*५ ऑगस्ट २०२४*
*पहिला श्रावणी सोमवार*
हंपी या वैभवशाली शिल्पनगरीमध्ये नीलगगनाच्या घुमटाखाली हिरव्या वृक्षराजीच्या छायेमध्ये विसावलेल्या शिवमंदिरात आम्ही सहकुटुंब आलो होतो. हे मंदिर पाताळेश्वर नेलमालिगी देवालय म्हणून तसेच प्रसन्न विरूपाक्ष मंदिर या नावाने ओळखले जाते. या पूर्वाभिमुख देवालयाचा पृष्ठभाग जमिनीला जवळजवळ समांतर असून ते भूस्तरापासून खाली आहे. म्हणून याला पाताळेश्वर मंदिर म्हणतात . पूर्वी हे मंदिर फक्त राज परिवारासाठी असून सामान्य प्रजाजनांना त्यात प्रवेश नव्हता.

मंदिराच्या द्रविड स्थापत्यशैलीवरून पहिल्या बुक्करायाच्या कारकिर्दितील हे मंदिर असावे असे मानतात. देवालयाच्या भव्य प्रांगणात घडीव प्रमाणबद्ध पायऱ्यांच्या प्रवेशद्वारातून आम्ही प्रवेश केला. मंदिराचे महामंडप, अर्ध मंडप, अंतराल आणि गर्भगृह असे स्वरूप आहे. नाजूक कलाकुसरीने नटलेल्या प्रमाणबद्ध स्तंभांवर तोललेला भव्य महामंडप पाहून मन आश्चर्याने थक्क झाले.याच्या छतावर सहस्त्र दलांची कमलपुष्पे व सुंदर वेलबुट्टी कोरलेली आहे. या मंदिराची निर्मिती भूस्तराखाली एका तलावात केली आहे. त्यामुळे या मंदिरात चहूबाजूंनी असलेल्या पाटांमध्ये सतत शीतल जल झुळझुळत असते. दिवाळीच्या आल्हाददायक वातावरणात त्यामुळे अधिकच भर पडली होती.त्या जलात छाया प्रकाशाचा सुंदर खेळ रंगला होता.हिरव्या,निळ्या सोनपिवळ्या रंगछटा मन वेधून घेत होत्या. वरील सुंदर कोरीवकाम केलेल्या छताचे प्रतिबिंब खालील जललहरींमध्ये पडले होते. आणि जललहरींवर हेलकावणारा प्रकाश पुन्हा छतावर प्रतिबिंबीत होत होता. माझ्या मुलाला प्रितेशला छायाचित्रणाची अतिशय आवड असल्यामुळे त्याने तिथे छायाचित्रणाचा आनंद मनसोक्त लुटला. तिथून दर्शनासाठी आत निघालो पण गर्भगृहासमोरील भव्य नंदी पाण्यात बुडाला होता. पाण्यामुळे गर्भगृहातील शिवलिंगाचेही दर्शन घेता आले नाही. प्रत्यक्ष शिवमंदिरात येऊन देखील शिवशंभूंचे दर्शन घेता आले नाही ,याची रुखरुख मनात ठेवून बाहेरूनच शिवजींना मनोमन वंदन करून आम्ही निघालो .
पण म्हणतात ना, इच्छाशक्ती तीव्र असेल तर प्रत्यक्ष भगवान देखील दर्शन देतात. याची प्रचिती आम्हाला लगेचच आली. जवळच बडवी शिवलिंग म्हणजेच गरीबन लिंग मंदिराचे दर्शन घडले. एका निर्धन स्त्रीने हे मंदिर बांधले असून कानडीत बडवी म्हणजे निर्धन असा अर्थ असल्यामुळे बडवी शिवलिंग मंदिर असे म्हणतात . ग्रॅनाईट दगडांच्या या चौकोनी लहानशा,छत नसलेल्या मंदिराला वीटांचे शिखर आहे. गर्भगृहातील भव्य शिवलिंगाचे दर्शन घेऊन मनाचा गाभाराही आनंदाने आणि आश्चर्याने भरून गेला . अखंड काळ्या पाषाणातून कोरलेले हे तीन मीटर उंचीचे भव्य शिवलिंग आहे.त्यावर शिवशंकराचे त्रिनेत्र कोरलेले आहेत. जवळच असलेल्या लहानश्या कालव्यामुळे हे शिवलिंग कायमच पाण्याने वेढलेले असते. उघड्या छतातून येणाऱ्या सूर्य किरणांच्या सोनेरी अभिषेकात हे शिवलिंग न्हाऊन निघत होते. जणू काही प्रत्यक्ष सूर्य देवता शिवशंकरांवर अभिषेक करत होती.असीम मन शांतीचा हा अनुभव घेऊन आम्ही निघालो, तरी मनात ओंकारनाद निनादतच होता.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version