Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने शहरातील उद्याने आणि रुग्णालयांमध्ये डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर अभियान राबविण्यात आले असून उद्यानात येणारे नागरिक आणि रुग्णालयातील रुग्ण यांना डेंग्यू आजाराबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे.

        शहरात डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त पीसीएमसी अभियान राबविण्यात येत आहे. त्याद्वारे शहरातील विविध सर्व भागांमध्ये डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आज महापालिकेच्या उद्यानांमध्ये तसेच रुग्णालयांमध्ये डेंग्यूबाबत जनजागृती  करण्यात आली.

गजानन महाराज उद्यान येथे खेळणी परिसरामध्ये साचलेले पाणी, पालापाचोळा काढून स्वच्छता करण्यात आली आहे.  सखुबाई गवळी उद्यान येथे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. आवश्यक ठिकाणी किटकनाशक धूर फवारणी करण्यात येत आहे. तसेच शहरातील विविध भागात असलेल्या उद्यानांमध्ये देखील हे अभियान राबविण्यात येणार आहे. उद्यानात फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना तसेच रुग्णालयातील रुग्णांना बीट डेंग्यू या उपक्रमाबाबत माहिती देण्यात येत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले घर आणि  सभोवतालचा  परिसर स्वच्छ ठेवावे. आपल्या परिसरात डासोत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. डेंग्यू आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version