Spread the love

 

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पिंपरी चिंचवड शहरात संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यासाठीच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज मान्यता दिली आहे. या भवनाच्या उभारणीसाठी आवश्यक २०० कोटी रुपये रक्कमेच्या तरतुदीसह विविध विषयांना त्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता  आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक  शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये  पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक  सिंह यांनी या विषयांना  मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

अनेक दिवसांपासून संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्याची मागणी शहरातील  नागरिकांच्या वतीने महापालिकेकडे करण्यात येत होती. या मागणीस अनुसरून संविधान भवन आणि विपश्यना केंद्र उभारणीसाठी २०० कोटी रुपये रकमेच्या तरतुदीस प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे संविधान भवन व विपश्यना केंद्राबाबतची नागरिकांची प्रतीक्षा आता संपली आहे.

 

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी गिरवणार नाट्य अभिनयाचे धडे

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयांमध्ये  विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण  विकासाकरिता  नाट्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार असुन  याबाबतच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी  आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या ५ शाळांमध्ये हे  नाट्य प्रशिक्षण वर्ग भरविण्यात येणार आहेत. माध्यमिक  विद्यालय  नेहरूनगर, माध्यमिक  विद्यालय रुपीनगर, माध्यमिक विद्यालय थेरगाव,  माध्यमिक विद्यालय  वाकड आणि  माध्यमिक विद्यालय निगडी या विद्यालयांमधील १२५ विद्यार्थ्यांना प्रभाकर पवार नाट्य कंपनी यांच्याद्वारे नाट्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या नाट्य वर्गांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रंगमंचावर तालीम आणि सराव करण्याची संधी देखील महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 बैठकीत मंजूर विषय

महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजन लागू करणे, पिंपळे गुरव येथे आरक्षण क्र.३४७ बहुउद्देशीय इमारत व क्रीडांगण विकसित करणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि कै. ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयात रुग्ण सेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेले विविध उपकरणे खरेदी करणे, विविध भागातील रस्ते, नाले, प्रकल्प तसेच शहरात विविध ठिकाणच्या देखभाल व  दुरुस्तीच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version