Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुण्याचे महावितरण प्रभारी प्रादेशिक संचालक हे मनमानी कारभार करत असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनकडून करण्यात आली होती.त्याची दखल घेत महावितरण मुख्यालयाने तातडीने त्यांची उचलबांगडी केली आहे.पूर्णवेळ नवीन प्रादेशिक संचालक म्हणून भुजंग खंदारे यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले असून संघटनेच्या लढ्याला यश मिळाल्याने वीज ग्राहकांच्या अडचणी वेळेत सोडविण्यासाठी मदत होईल असे संघटनेने म्हटले आहे.

महावितरण प्रादेशिक संचालक पद हे गेली चार वर्षांपासून रिक्त होते.त्यामुळे गेली चार वर्षे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्याकडे कारभार होता.यादरम्यान पंचवीस लाख रकमेच्या पुढील कार्य पूर्तता अहवालांना दर्जा तपासणीच्या नावाखाली प्रादेशिक संचालक कार्यालयांकडे पाठविण्याचे आदेश नाळे यांनी काढले होते.त्याचा परिणाम म्हणून कामांना पूर्ण व्हायला दिरंगाई होत असल्याच्या अनेक तक्रारी ठेकेदार यांनी केल्या होत्या आणि शेवटी त्यामुळे वीज जोडण्या द्यायला दिरंगाई होत होती.या वादग्रस्त आदेशाला रद्द करण्याची मागणी करूनही त्याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याने,असोसिएशनने महावितरण मुख्य व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.त्यानुसार राज्यभरात असा कुठलाही नियम नसताना केवळ पुण्यात हा नियम लाऊन मनमानी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.त्याची दखल घेत मुख्यालयाने नाळे यांना पदावरून हटवून खंदारे यांना नियुक्ती देत पारदर्शी कारभाराचा आदर्श घालून दिल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.लवकरच नवनियुक्त प्रादेशिक संचालकांची भेट घेऊन,ग्राहक हिताच्या बाबींबाबत त्यांच्याशी चर्चा करून ग्राहकांना तत्पर सेवा द्यायला हातभार लावू असे असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version