*७ मार्च २०२४*
जयपूरमधील हवामहल पाहून आम्ही महाराजा सवाई जयसिंह यांनी निर्मिलेल्या जंतरमंतर या खगोलीय वेधशाळेच्या परिसरात येऊन पोहोचलो. जंतर म्हणजे यंत्र आणि मंतर म्हणजे गणना म्हणजेच हे गणनायंत्र होय. हिरवाईने नटलेल्या या विशाल परिसरात विविध आकारांच्या भव्य वास्तू म्हणजेच एकोणीस खगोलीय यंत्रे सूर्यप्रकाशात नहात डौलाने उभी होती. ही जगातील सर्वात मोठी दगडी खगोलीय वेधशाळा असून हिचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. साधारणपणे तीनशे वर्षांपूर्वीच्या काळातील प्रगत खगोलशास्त्रीय ज्ञानाचे हे भांडार पाहून मन थक्क झाले. इथे पाषाण, संगमरवर, तांबे, लोखंडाचा वापर करून खगोल शास्त्रातील विविध संकल्पना साकारल्या आहेत. या आजही उत्तमरीत्या कार्यरत आहेत. प्रत्येक यंत्रासमोर संगमरवरी फलकावर माहिती दिली आहे. तसेच येथील मार्गदर्शक हे यंत्र कोणत्या संकल्पनेवर आणि कसे काम करते हे छान समजावून सांगत होते.
प्रवेशद्वाराजवळ दोन मोठे स्तंभ आणि त्यांच्यामध्ये लटकवलेल्या धातूच्या गोळ्याने लक्ष वेधून घेतले. या उन्नतांश यंत्राने आकाशाचे विविध कोनातील उंचीचे मोजमाप करता येते. जयप्रकाश यंत्र या मोठ्या वाटीसारख्या गोल पांढऱ्या तबकडीवरून सूर्य कोणत्या राशीत आहे आणि त्याचे जन्म कुंडलीतील स्थान बघता येते. पृथ्वी किती अंशात फिरते आणि सूर्य व पृथ्वी यातील कोन किती अंशाचा आहे हे दोन लोखंडी चक्राकारातील रामयंत्र सांगते. सम्राट यंत्र हे जगातील सर्वात मोठे दगडी सूर्य घड्याळ असून यातील बृहत सम्राट आणि लघु सम्राट यंत्रांमध्ये त्रिकोणी भिंतीची सावली पूर्व किंवा पश्चिम दिशेला पडते, त्यावरून वेळ ठरवली जात असून ते दोन ते वीस सेकंदापर्यंत अचूक वेळ दाखवते. तसेच यावरून सूर्य उत्तरायण किंवा दक्षिणायणात आहे हे देखील कळते. अशी त्रिकोणी, अर्धवर्तुळ, वर्तुळ, लंबगोल, काटकोन त्रिकोण, उंच भिंती, पायऱ्या अशा रचनेतील विविध यंत्रे पाहताना मनातली उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती.
येथील त्रिकोणी उतरत्या भिंती सारख्या ध्रुव दर्शक पट्टीकेवरून रात्री ध्रुवताऱ्याच्या स्थितीची माहिती मिळते. राशीवलय यंत्र हे बारा यंत्रांचा समूह असून बारा यंत्रे बारा राशींची चिन्हे दाखवत होती. ज्योतिष गणनेसाठी आणि खगोलीय मोजमापासाठी असलेले क्रांतीवृत्त व घंटेच्या आकारातील यंत्रराज, षष्टांश यंत्र, प्रभा यंत्र, कपाली यंत्र देखील पाहिले. आपण एखाद्या जादुई नगराची सफर करत आहोत असेच मला वाटत होते.
महाराजा सवाई जयसिंह हे स्वतः खगोल शास्त्रज्ञ होते. विविध ग्रंथांच्या सखोल अभ्यासातून आणि विद्वानांच्या मार्गदर्शनातून जंतरमंतरचे हे अद्भुत विश्व साकारले आहे. ग्रह, ग्रहण स्थिती, कालगणना, ताऱ्यांची आणि सूर्य मंडळाची गती यांचा अभ्यास येथे उत्तमरित्या करता येतो. हे पाहून महाराजांच्या बुद्धिमत्तेला आणि हे सर्व साकारणाऱ्या विद्वानांना आणि कारागिरांना मनोमन सलाम केला. शैक्षणिक सहलीसाठी हे अतिशय उत्तम स्थळ आहे. अगदी बालवयापासूनच जिज्ञासा जोपासणारी, विविध खगोलीय संकल्पना स्पष्ट करणारी, वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारी आणि खगोलीय क्षेत्रामध्ये कारकीर्द करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ही वेधशाळा पाहण्यासाठी तुमच्या घरातील बालगोपालांना घेऊन कधी येताय मग?
- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
