Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ११ (कृष्णानगर) येथील कोमल वाईन्स शॉप परिसरात मद्यविक्रीमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी तसेच वाहतुकीस निर्माण होणाऱ्या अडथळ्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार तसेच चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, कोमल वाईन्स परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व लहान मुलांना याचा त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कृष्णानगर, कोयना नगर, शरद नगर, घरकुल, महात्मा फुले नगर तसेच शिवाजी पार्क परिसर हा मोठ्या प्रमाणात लोकवस्तीचा भाग असल्याने सार्वजनिक शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच, महात्मा फुले नगरचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे काका, कोयना नगर कृती समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र गुरव तसेच इंगवले काका उपस्थित होते.
कोमल वाईन्स परिसराची प्रशासनाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि सार्वजनिक शांततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी मारुती गणपत जाधव यांनी केली आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version