Spread the love
पुस्तकांशी मैत्री विद्यार्थ्यांच्या विकासाची गुरुकिल्ली : उप महापौर शर्मिला बाबर
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ अभ्यासक्रमातील ज्ञानासोबतच अवांतर वाचनाची सवयही तितकीच महत्त्वाची आहे. पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि त्यांना नवी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना विविध विषयांचे अवांतर ज्ञान मिळावे आणि वाचनातून त्यांच्या विचारशक्तीला नवी दिशा मिळावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत येथील शाळेच्या वाचनालयासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या वतीने पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी सहगामी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री जाधव यांच्यासह सहशिक्षक समुद्र शर्मिला, चारुशीला जाधव, अर्चना ओहोळ, वर्षा गुंजाळ, पांडुरंग घुगे, सोनाली डूमणे, शशिकांत चौधरी, प्रियांका भानगडे, भाकेश्वर दांडगे तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच वाचनाची सवय आणि वाचनसंस्कृती रुजणे गरजेचे आहे. पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना केवळ नवे ज्ञान मिळत नाही, तर त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते, विचारांची व्याप्ती वाढते आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि पुस्तकांशी त्यांची मैत्री दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. वाचनातून घडणारी विचारशील आणि जिज्ञासू पिढी हीच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version