Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी, रहाटणी, विजय नगर, तापकीरनगर, भारतमाता चौक, नढेनगर, कोकणेनगर, पाचपीर चौक, आदर्शनगर आणि ज्योतिबानगर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसामुळे या परिसरातील रस्त्यांची अवस्था अधिकच खराब झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे तापकीर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
खड्ड्यांमुळे अनेक नागरिक घसरून पडून जखमी झाल्याचेही त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रस्ता ओलांडताना आणि वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन या सर्व भागातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास नागरिकांच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आता या गंभीर रस्ते समस्येवर काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version