
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा ‘वंदे मातरम्’ गीताच्या नावाखाली तहकूब करण्यात आल्याने शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. महासभा तहकूब झाल्यानंतर शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी पत्रकार परिषद घेत, शहराच्या विकासाशी संबंधित ३० पेक्षा अधिक महत्त्वाचे विषय प्रलंबित राहिल्याचा आरोप केला. यावेळी नगरसेविका सुलभा उबाळे आणि नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस उपस्थित होत्या.
विश्वजीत बारणे म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ गीताला शिवसेनेचा कोणताही विरोध नाही. मात्र, त्यासाठी संपूर्ण महासभा तहकूब करण्याऐवजी केवळ दहा मिनिटांची तहकुबी करण्याची मागणी करण्यात आली होती. सभा पुढे ढकलल्यामुळे शहराच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“पुढील महिन्यात १७ तारखेपासून गणपती उत्सव सुरू होत आहे. त्यामुळे आजची महासभा होणे अत्यंत गरजेचे होते. कुत्र्यांचा प्रश्न, रस्त्यांवरील खड्डे, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, पाणी कपातीचा निर्णय तसेच स्थापत्य विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय आता महिनाभर पुढे ढकलले जातील. यामुळे शहराचे नुकसान होणार आहे,” असा आरोप बारणे यांनी केला.
मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळण्यासह शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय महासभेच्या अजेंड्यावर होते. कचरा व्यवस्थापनासह दहा लाख रुपयांच्या विविध विकासकामांशी संबंधित विषयांचाही समावेश होता. मात्र, महासभा तहकूब झाल्याने या विषयांवर निर्णय होऊ शकला नाही आणि विकासाला अडथळा निर्माण झाल्याचे बारणे यांनी सांगितले.
दरम्यान, नगरसेविका सुलभा उबाळे यांनी भाजपचे पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत निषेध केला. महासभा चालू न दिल्यामुळे शहराच्या विकासाचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित राहिले असून, याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी स्वीकारावी, अशी टीका त्यांनी केली.
शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या विषयांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक असताना महासभा तहकूब करणे योग्य नसल्याचे सांगत शिवसेनेने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

