
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालणे कठीण झाले असून, श्वानदंशाच्या घटना वाढत असतानाही प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.
शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भोईर यांनी केली.
शहरातील सर्व प्रभागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि अँटी-रेबीज लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवावी. नागरिकांवर हल्ले करणाऱ्या आक्रमक कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात आली.
श्वानदंशाच्या घटनांनंतर नागरिकांना उपचारासाठी धावपळ करावी लागू नये, यासाठी महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लस आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा २४ तास उपलब्ध ठेवावा. तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र २४×७ हेल्पलाइन सुरू करावी, अशी मागणी भोईर यांनी केली.
“पिंपरी-चिंचवडकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या महापालिका प्रशासनाला आता जागे करण्याची वेळ आली आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालताना भटक्या कुत्र्यांची भीती वाटत असेल, तर ही प्रशासनाची मोठी नामुष्की आहे. नसबंदी, लसीकरण आणि आक्रमक कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करा. आता आश्वासन नको, प्रत्यक्ष कारवाई हवी,” असा इशारा भाऊसाहेब भोईर यांनी दिला.
पुढील काही दिवसांत प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ठोस उपाययोजना न केल्यास यापेक्षाही तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असे भोईर यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपला लढा सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
