
स्वीकृत नगरसदस्यपदाचा तिढा सोडवण्यात भाजप आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नेतृत्व यशस्वी ठरणार की अंतर्गत वादामुळे अंतिम निर्णयाला पुन्हा खो बसणार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वीकृत नगरसदस्यपदाच्या निवडीवरून भाजपमध्येच अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. इच्छुकांची संख्या, नावांवरील मतभेद आणि पक्षांतर्गत समीकरणांमुळे अंतिम निर्णय पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसदस्यपदासाठी इच्छुकांच्या आशा-अपेक्षा पुन्हा ताणल्या गेल्या आहेत.
स्वीकृत नगरसदस्यपद मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. प्रत्येक इच्छुक आपापल्या राजकीय वजनाचा वापर करून उमेदवारी निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. मात्र, एका नावावर एकमत साधताना पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिल्याची चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे ८४, राष्ट्रवादी काँँग्रेसचे (अजित पवार) ३७, शिवसेनेचे (शिंदे) सहा आणि एक अपक्ष असे १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळानुसार भाजपचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन असे दहा स्वीकृत नगरसेवक असतील. प्रशासनाने मार्च महिन्यात स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची प्रक्रिया राबविली होती. प्रशासनाने मागविलेल्या मुदतीत केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघांचे अर्ज आले होते. परंतु, नावे निश्चित होत नसल्याने भाजपने अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. भाजपची नावे आली नसल्याने तत्कालीन आयुक्तांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला होता.
भाजपकडून तीन महिने हा विषय तहकूब केल्यानंतर जूनमध्ये दफ्तरी दाखल करण्यात आला होता. अर्धवट असलेल्या प्रस्तावामध्ये दुरुस्ती करून सुधारित प्रस्ताव आणण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता. परंतु, जूनपासून प्रशासनाने स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसाठी कोणतीही प्रक्रिया राबविली नाही. भाजपच्या एकानेही अर्ज दाखल केला नाही. त्यांची कागदोपत्री प्रक्रिया झाली नाही. असे असताना महापौर रवी लांडगे यांच्या १२ ऑगस्टच्या पत्रानुसार दहा स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी पुन्हा ठेवण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची गुरुवारी (दि.20) होणार्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार की तो प्रस्ताव पुन्हा रखडणार याकडे लक्ष लागले आहे.
