
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील साई गार्डन येथे श्रीमत् जगद्गुरु साईबाबा प्रतिष्ठान व मंगला कदम यांच्या वतीने सालाबादप्रमाणे नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
नागपंचमीच्या पवित्र पर्वानिमित्त आयोजित या उत्सवात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पारंपरिक खेळ, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पारंपरिक रूढी-परंपरांना आधुनिक काळातही जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
यावेळी महिलांनी रंगीत व आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध खेळ व नृत्यांचे सादरीकरण केले. तालावर थिरकणाऱ्या महिला समूहांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे संपूर्ण साई गार्डन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सहभागी महिलांचे कौतुक केले.
नागपंचमी हा केवळ धार्मिक सण नसून भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची, आपला सांस्कृतिक वारसा जपण्याची आणि आनंदाचे क्षण सामूहिकरित्या साजरे करण्याची संधी मिळाली.
भक्तीभाव, पारंपरिक संस्कृती आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा नागपंचमी उत्सव अविस्मरणीय ठरला. उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे भक्तीभावाने नागदेवतेचे स्मरण करत उत्सवाचा आनंद घेतला.

