Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागरमधील झुलेलाल सोसायटी, ट्रायोज सोसायटी ते नॅच्यूरल आईस्क्रीम दरम्यानचा गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला १८ मीटर रस्ता अखेर मार्गी लागणार आहे. माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक नाना काटे यांच्या पुढाकारातून हा रस्ता खासगी विकसकाच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार असून, येत्या ६ महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

या रस्त्याच्या कामाची पाहणी आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी नाना काटे यांच्या उपस्थितीत ट्रायोस सोसायटी, झुलेलाल टॅावर सोसायटी, सुखवाणी सेलिनो सोसायटीमधील नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यामुळे होणाऱ्या अडचणी मांडल्या.

यावेळी आसवाणी प्रमोटर्स अँड बिल्डर्स चे प्रमुख श्रीशेठ आसवाणी, युनिटेक्स इन्फ्रा चे श्री. घाडगे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह ट्रायोस सोसायटी, झुलेलाल टॅावर सोसायटी, सुखवाणी सेलिनो सोसायटीचे चेअरमन, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

या रस्त्याच्या विकासासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम आसवाणी प्रमोटर्स अँड बिल्डर्स यांच्यामार्फत विकसित करण्यात येणार यूनिटेक्स इन्फ्रा या कत्राटदारामार्फत केले जाणार आहे. त्याबदल्यात संबंधित विकसकाला महापालिकेमार्फत टीडीआर अथवा एफएसआयच्या स्वरूपात मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली नाना काटे यांनी दिली.

रस्त्याच्या विकासासोबतच स्ट्रॉंम वॉटर, ड्रेनेज लाईन, भूमिगत केबल, फुटपाथ व काँक्रीटचा रस्ता तसेच इतर पायाभूत सुविधांची कामेही करण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याबाबत वेळोवेळी आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नव्हती. आता खासगी विकासाच्या माध्यमातून काम हाती घेण्यात येणार असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रलंबित रस्त्याच्या कामाचे स्वरूप आणि वर्क ऑर्डर पाहून उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपळे सौदागरमधील या महत्त्वाच्या रस्त्याचा दहा वर्षांचा प्रलंबित प्रश्न अखेर सुटणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version