
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यान्वित यंत्रणा बैठक
चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश
पार्किंगसाठी मोकळ्या जागांचा वापर; अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाई, वाहतूक व्यवस्थेसाठी १०० एमएसएफ जवानांची नियुक्ती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पार्किंग, अतिक्रमणे, वीजपुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर विविध शासकीय यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट कालमर्यादा व जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या.
या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पीएमआरडीए, एम. आय.डी.सी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी, एमएसआयडीसी, जिल्हा परिषद या सर्व यंत्रणाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार चाकण औद्योगिक परिसरातील विविध प्रश्नांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत एमआयडीसी, एमएसआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद, जिल्हा परिषद, महसूल व पोलीस विभागांसह विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विविध यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असताना निर्माण होणारा समन्वयाचा अभाव दूर करून एकत्रितपणे उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
३१ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश
चाकण औद्योगिक परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तसेच साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कामात विलंब झाल्यास संबंधित सक्षम प्राधिकारी, अभियंता व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
रस्त्यावरील पार्किंगला शुक्रवारपासून प्रतिबंध
चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असलेल्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एमआयडीसी परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांचा पार्किंगसाठी वापर करण्यात येणार असून, तळेगावपासून भंडारा डोंगर परिसरापर्यंत उपलब्ध जागांचा नियोजनबद्ध वापर केला जाणार आहे.
शुक्रवारपासून रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करण्यास पूर्णतः प्रतिबंध राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबण्यात येणार आहे.
वाहतूक व्यवस्थेसाठी १०० एमएसएफ जवान
चाकण औद्योगिक परिसराचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेता पोलीस मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी १०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) जवान पोलीस विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे जवान दोन पाळ्यांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी कार्यरत राहतील.
रस्त्यावर वाहन बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था करण्यात येणार असून, बंद पडलेली वाहने तातडीने रस्त्याच्या बाजूला अथवा निर्धारित ठिकाणी हलविण्यात येतील.
अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई
चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, चहाच्या स्टॉल्स, गोदामे व अन्य अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधितांना नियमानुसार नोटीस देऊन २५ ऑगस्टपासून पुढील एक महिन्यात अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
अतिक्रमण हटविल्यानंतर संबंधित जागेवर तातडीने रस्ता अथवा आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीचे अतिक्रमण राजकीय अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे कारवाईतून वगळले जाणार नाही. याबाबतही ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन
चाकण परिसरातील सुमारे ५०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करण्यात येत असून, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक वाहतूक सिम्युलेशनच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे.
यामुळे वाहतूक कोंडी, अपघात, बंद पडलेली वाहने आदी बाबींची माहिती तातडीने उपलब्ध होऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करता येणार आहे.
