
हायर परचेस नोंदणी व बोजा उतरविण्याची कामेही रखडली; हजारो वाहनचालक-मालकांना फटका
पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील वाहन हस्तांतरण प्रक्रिया गेल्या तीन आठवड्यांपासून पूर्णपणे ठप्प असल्याने वाहनचालक, वाहनमालक तसेच वाहन व्यवसायाशी संबंधित नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहन हस्तांतरणासोबतच हायर परचेस नोंदविणे आणि हायर परचेसचा बोजा उतरविणे यांसारखी महत्त्वाची कामेही रखडल्याने राज्यभरातील हजारो नागरिकांची कामे प्रलंबित आहेत.
या गंभीर समस्येवर तातडीने मार्ग काढावा, या मागणीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्र राज्य चालक-मालक प्रतिनिधी महासंघ आणि मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.
गेल्या तीन आठवड्यांपासून वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया ठप्प असल्यामुळे वाहनांची खरेदी-विक्री, मालकी हस्तांतरण तसेच संबंधित आरटीओ कामकाजावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर वाहनांवरील हायर परचेस नोंदणी आणि बोजा उतरविण्याची प्रक्रिया बंद असल्याने वाहनमालकांना आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ही समस्या केवळ वाहनमालकांपुरती मर्यादित नसून मोटार ड्रायव्हिंग स्कूल, वाहन विक्रेते, फायनान्स कंपन्या तसेच वाहन व्यवसायाशी संबंधित विविध घटकांवर त्याचा परिणाम होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे सर्वेसर्वा बाबासाहेब शिंदे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासंघाचे पदाधिकारी बापू भावे, विक्रांत विरंगुळकर, निलेश ढवळे, तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे विनोद वरखडे (प्रसिद्धी प्रमुख) आणि सुरज देवकर (सोशल मीडिया प्रमुख) उपस्थित होते.
राज्यातील वाहनचालक आणि वाहनमालकांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून वाहन हस्तांतरण, हायर परचेस नोंदणी आणि बोजा उतरविण्याची प्रक्रिया पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हजारो नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित हा प्रश्न असल्याने केंद्र व संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा वाहनचालक-मालक प्रतिनिधींनी व्यक्त केली.
