
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नारायण सुर्वें यांच्या कविता केवळ शोषितांच्या जीवन-जाणिवेची त्यांच्या श्रमनिष्ठेची, शोषणाच्या प्रक्रियेची चिकित्सा करणाऱ्या नाहीत तर त्यांच्या वागण्या, जगण्यातून, आत्मनिष्ठेतून प्रगट होणाऱ्या जिवंतपणा दाखवणाऱ्या आहेत. सुर्वेंनी कामगारांना हातावर घट्टे पडलेले आहेत ते कागदावर लिहा असे म्हणत कामगारांना लिहिते केलं, त्यांनी श्रमाचे मोल अधोरेखित केले असे प्रतिपादन नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कामगार आणि सुर्वे यांचे साहित्य या विषयावर सदाफुले यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, नारायण सुर्वे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पण लढा दिला. १९९५ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन यशस्वी संमेलन पूर्ण केले मध्य प्रदेश सरकारने संत कबीर पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्ताने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम केले जात असून त्यानिमित्ताने सुर्वे यांच्या साहित्याचा जागर करण्यात येत आहे.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, सचिव तुषार घाटुळे,उपाध्यक्ष राजेश माने, निरंजन लोखंडे,लाला राठोड, इंदुबाई वाघचौरे, विद्या चव्हाण, रंजना गायकवाड, अनिता कोरे, विजया पाटील,सुनीता चव्हाण आदीसह कामगार उपस्थित होते.
