
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘नाही होत स्वतंत्रता
शिवकथा घोटून भाटापरी
घ्यावे लागतसे शिवाजी बाजीपरी
हे मस्तक स्वहस्तावरी!”
असा सशस्त्र क्रांतीचा संदेश देऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा यज्ञ पेटवून आजही भारतीय तरुणांच्या मनात ती ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करीत शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी चिंचवडगावातील क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेविका मनीषा चिंचवडे आणि सनदी लेखापाल के.एन बन्सल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह अॅड. सतिश गोरडे, कोषाध्यक्ष रविद्र नामदे, सेवाभारती प्रांताचे लक्ष्मीकांत देशपांडे, ग्रामविकास चे भास्कर भोर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह अविनाश आगज्ञान, नगर सहकार्यवाह अतुल सुबंध, अविनाश गोखले, किरण भोईर, गतिराम भोईर, संस्था पदाधिकारी डॅा शकुंतला बन्सल, आसाराम कसबे, नितीन बारणे, सुहास पोफळे, हेमाराम चौधरी, विश्वस्त मधुसूदन जाधव, मुख्याध्यापिका वर्षा जाधव आणि क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर व विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच चिंचवड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविकातून संस्थेचे कार्यवाह अॅड. सतिश गोरडे यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले. नगरसेविका मनीषा चिंचवडे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत संपूर्ण वंदे मातरम्, राष्ट्रगीत, ध्वजगीत सादर करून देशभक्तिपर घोषणा देत ध्वजाला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनात
व्यवस्थापक अतुल आडे, कार्यकर्ते समीर काळे, अॅड. अक्षय कदम, सागर शेवाळे, किरण गायकवाड, प्राजक्ता कदम, अंजली सूर्यवंशी, विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी माजी सैनिक राजाराम भिलारे यांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तिपर गीतांचे गायन केले. त्यांचा सत्कार अॅड. सतिश गोरडे यांच्या हस्ते करण्यात आला. हर्षदा धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. आसाराम कसबे यांनी आभार मानले.

