Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे वाढते प्रमाण आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चिखली आणि रावेत परिसरातील अलीकडील घटनांची दखल घेत नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

चिखली येथे चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी लहान मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली. तर रावेत येथील सिटी प्राईड शाळेजवळ एका महिला व मुलीचा भटक्या कुत्र्यांनी दुचाकीवरून पाठलाग करून त्यांना खाली पाडल्याची घटना घडली. अशा घटनांमुळे शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालये, उद्याने, सोसायट्या, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे टोळके आढळून येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने संपूर्ण शहरातील कुत्र्यांचे सर्वेक्षण करून निर्बीजीकरण (ABC) आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्या आक्रमक कुत्र्यांवर तातडीने कार्यवाही करावी. तसेच संवेदनशील ठिकाणी विशेष पथके नियुक्त करून नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी हेल्पलाइन आणि तातडीची प्रतिसाद यंत्रणा सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेने या प्रश्नावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नाना काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version