
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम यांनी रवी रमेश नांगरे यांची पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील नियुक्तीपत्रात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरासाठी रवी रमेश नांगरे यांच्या नावाचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहनही पत्राद्वारे करण्यात आले आहे.
या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाला संघटनात्मक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच अनुसूचित जाती समाजातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काम करणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रवी रमेश नांगरे यांनी सांगितले.
नांगरे यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
