Spread the love

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून उद्योजकतेचा ध्यास घ्यावा; ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६’मध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – “पदवी घेऊन नोकरी करण्यापेक्षा आपण इतरांना रोजगार देऊ शकतो का, याचा संकल्प विद्यार्थ्यांनी आतापासूनच करावा. मोठी स्वप्ने पाहा, अपयशाला घाबरू नका आणि ज्ञानासोबत आवश्यक कौशल्ये आत्मसात करा,” असे आवाहन उद्योगपती व समाजसेवक शैलेश शहा यांनी केले.

चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६ चे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शैलेश शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ (नाना) शिवले, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सचिव डॉ. दीपक शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, बी.एड.च्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, समन्वयिका डॉ. श्रुती गणपुले यांच्यासह प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना शैलेश शहा म्हणाले, “प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे आणि आयुष्यात यशस्वी व्हावे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळविण्याचे ध्येय न ठेवता भविष्यात इतरांना रोजगार देण्याचा विचार करावा.” दैनंदिन अभ्यासासोबत मोठी स्वप्ने पाहा, मोबाईलचा वापर करा; मात्र त्याचे गुलाम बनू नका, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा, यशस्वी व्यक्तींची पुस्तके वाचण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला. अडचणीच्या काळात साथ देणारी आणि योग्य मार्गदर्शन करणारी मैत्री निवडावी, असेही त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ (नाना) शिवले यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन केले. “अडचणीच्या प्रसंगी खचून जाऊ नका. माणसे ओळखायला शिका आणि आपल्या जबाबदारीचे भान ठेवा,” असा संदेश त्यांनी दिला.

संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्षे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. नियमित महाविद्यालयात उपस्थित राहणे, ग्रंथालयात अभ्यास करणे, प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणे आणि शिक्षणासोबत व्यवहारज्ञान व पूरक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी पुरेशी नाही. औद्योगिक व कॉर्पोरेट क्षेत्रात आवश्यक कौशल्ये आत्मसात केली तरच भविष्यात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करता येईल. या तीन वर्षांत अभ्यास करा, कष्ट करा, जिद्द बाळगा आणि ध्येयापासून दूर जाऊ नका,” असे आवाहन डॉ. शहा यांनी केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी केली, तर स्वागतपर भाषण उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी गणेशवंदना, ‘महाराष्ट्राची लोकधारा’ तसेच बॉलीवूड नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ‘माइंड स्पार्क’ स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नव्या दंडवाणी व प्रा. कानन पडते यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. राजश्री ननावरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version