Spread the love

संमेलनाध्यक्ष मा. डॉ. श्रीपाल सबनीस यांचे पुस्तक प्रकाशन समारंभात गौरवोद्गार

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘‘समाजाच्याप्रति जे जे चांगले, बेरजेचे आहे ते काम डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले. धर्माची अस्मिता आणि संयम यांची जपवणूक त्यांनी केली. अनेकविध जाती-धर्मांतील मित्र त्यांनी जोडले आहेत. चांगले ते घ्यावे हा सकारात्मक विचार त्यांनी जपला आहे. त्यामुळेच आमची मैत्री झाली आहे. चार्टर्ड अकाउंटंट असणार्‍या प्रा.डॉ. पगारिया यांनी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदही भूषविले आहे, कारण इतर क्षेत्रांतील योगदानाबरोबर साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही महत्त्वाचे आहे.’’ डॉ. अशोककुमार पगारिया लिखित व यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित ‘संवेदना मनातल्या आणि प्रतिक्रिया थोरांच्या’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ प्रीतम प्रकाश महाविद्यालयाच्या महावीर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रकाशन माजी अ. भा. मराठी सा.संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी विधानसभा अध्यक्ष मा. दिलीप वळसे पाटील यांनी भूषविले.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी शिक्षणमंत्री प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे, तंजावर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले, प्रकाशक प्रा. रूपाली अवचरे उपस्थित होत्या.

यावेळी माजी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, माझ्या आयुष्यात एक संवेदनशील माणूस, बहुआयामी समाजाच्या बांधिलकीचा वसा आणि वारसा जपणारा, धर्म, संस्कृती, नैतिकता या मूल्यांची जपवणूक करून समाजाशी असलेली नाळ जोडण्याचे काम, 33 वर्षे प्राध्यापक, चार्टर्ड अकौन्टट म्हणून काम करणारे डॉ. अशोककुमार पगारिया एक संवेदनशील लेखक म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो.
ते पुढे म्हणाले की, डॉ. पगारिया यांनी विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा देणारे शिक्षण दिले. बँकिंग सहकार क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आर्थिक शिस्त लावली, समाजाप्रति त्यांनी बांधिलकी जपली. धर्म, संस्कृती, नैतिक मूल्यांची जपवणूक केली. डॉ. अशोककुमार पगारिया ह्यांच्या बुद्धीची कुशाग्रता मी लहानपणापासून पाहत आलो आहे, कारण ते माझ्या मतदारसंघातील, माझ्या गावाजवळील धामणी गावचे आहेत. तेथून पुण्यात येऊन त्यांनी सामाजिक, शैक्षणिक धार्मिक आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या सकारात्मक कामगिरीमुळे नावलौकिक संपादन केला आहे याचा मला अभिमान आहे.

मा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांनी मनोगतात म्हटले की, 24 तीर्थंकरांपैकी वर्धमान महावीरांची भूमिका मार्गी लावणारे डॉ. अशोककुमार पगारिया चांगुलपणाच्या वास्तवाच्या अपेक्षा स्वीकारतात. ते शब्दांवर निरपेक्ष प्रेम करतात. ज्ञानाची गंगा गोरगरीब लोकांपर्यंत नेताना मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतात. प्रवचनाच्या माध्यमातून महावीरांची भूमिका मांडतात. ज्ञानेश्वर, तुकारामांचा वसा व वारसा जपताना दिसतात. समाजासाठी केलेली सेवा फलदायी व्हावी हेच आईच्या संस्कारातून मिळालेले बाळकडू त्यांच्या कृतीतून दिसून येते. भगवान महावीरांच्या अहिंसा, अनेकान्तवाद या तत्त्वांचे पालन करीत असताना मानवसेवेचे प्रकल्प ते राबवितात. त्यांच्या पुस्तकात समाजाच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक भूमिकेतून त्यांनी स्पष्ट विचार मांडले आहेत.
या कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य मा. सदाशिव कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पुस्तक लिहिण्यापाठीमागील भूमिका मा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी मांडली. पगारिया सरांची कन्या सुप्रिया छल्लाणी हिने सादर केलेल्या ‘कैसे कर लेते हो पापा’ ह्या कवितेने वातावरण भावुक झाले आणि सर्वांचे डोळे पाणावले. या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागप्रमुख विभा ब्राह्मणकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मा. विलासशेठ पगारिया यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version