Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या पावसाळ्यात मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. शहरातील सर्व खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर तातडीने बुजवावेत, अशी मागणी भाजप संत तुकाराम नगर–कासारवाडी–खराळवाडी मंडळाचे अनुसूचित जाती (एस.सी.) मोर्चाचे अध्यक्ष निलेश राजू आढाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

आढाव यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेने रस्ते विकास आणि दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला असला, तरी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक रस्ते उखडून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून यामुळे महापालिकेच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करदात्या नागरिकांच्या पैशांचा योग्य वापर झाला का, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रस्त्यांच्या कडेला साचलेली खडी आणि खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे सातत्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी तसेच पादचारी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महानगरपालिकेने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दर्जेदार पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती करावी. तसेच शहरातील धोकादायक खड्ड्यांचे सर्वेक्षण करून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही निलेश आढाव यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version