
हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी; सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा संभाजी बारणे यांचा निषेध
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संभाजी बाळासाहेब बारणे यांनी तीव्र निषेध केला आहे. महिलांचा सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा असून, अशा प्रकारची वक्तव्ये अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार व राज्यातील महिलांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात बारणे यांनी म्हटले आहे की, राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
सुनेत्रा पवार राज्याच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असताना त्यांच्यावर करण्यात आलेली वैयक्तिक टीका ही राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या महिला सन्मानाच्या परंपरेचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगत, संबंधितांनी केवळ स्पष्टीकरण न देता सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीला राष्ट्रवादी काँग्रेस कधीही खपवून घेणार नसल्याचा इशाराही बारणे यांनी दिला. आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

