Spread the love

सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा निषेध; माफी मागा, अन्यथा मावळात जनआक्रोश उभा राहील – आमदार सुनील शेळके

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही आक्रमक भूमिका घेत संबंधित काँग्रेस नेत्यांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा मावळातील नागरिकांच्या तीव्र जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

महिलांविषयी अवमानकारक आणि असभ्य भाषेचा वापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत आमदार शेळके म्हणाले की, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र त्यासाठी महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी बाब आहे. अशा प्रवृत्ती केवळ माफी मागून थांबणार नाहीत, तर त्यांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर ठामपणे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेससह विविध स्तरांतून निषेध व्यक्त होत असून, संबंधितांनी तातडीने जाहीर माफी मागून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version