Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी (४ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एका युगाचा अंत झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. माजी राज्यपाल, दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ आणि डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी केवळ शैक्षणिक संस्था उभारल्या नाहीत, तर लाखो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानत त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, क्रीडा आणि विविध शाखांमध्ये शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. त्यांच्या कार्यामुळे भारतासह जगभरातील हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
त्यांचे अंत्यदर्शन बुधवार (५ ऑगस्ट) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील यशवंत निवास येथे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी ५ वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज विद्यापीठ परिसर, लाईन बाजार, कसबा बावडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले की, “डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन हा आमच्या कुटुंबावर आणि माझ्यावर मोठा आघात आहे. त्यांनी शिक्षणालाच जीवनकर्तव्य मानले. सक्रिय राजकारणापेक्षा शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. त्यांची ज्ञानसेवेची परंपरा आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणा भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल.”
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षणविश्वाने दूरदृष्टीचा, मूल्यनिष्ठ आणि समाजाभिमुख शिक्षणमहर्षी गमावला असून, त्यांच्या कार्याचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version