
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि संघर्षातून श्रमिक, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदनांना आवाज दिला. त्यांच्या लेखणीतून कामगारांच्या श्रमाला सन्मान मिळाला, तर त्यांच्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त करून दिले, असे प्रतिपादन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लाला राठोड, अनिल कदम, विजय भोसले, कावेरी सेलके,रोहिणी आजबे,राजेश्री गायकवाड,लक्ष्मी शेवडे,मनिषा गवळी,वनिता डोंगर, अस्मिता कोळे,विद्या राऊत ,रुपा गुंडे,राणी क्षीरसागर
यांसह विविध क्षेत्रातील कष्टकरी, कामगार, फेरीवाले उपस्थित होते.
यावेळी बोलताना नखाते म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षाने व्यापलेले होते. गरीबी, उपासमार, सामाजिक विषमता आणि भेदभावाचा सामना करत त्यांनी साहित्याला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवले. त्यांच्या लेखणीतून केवळ कथा-कादंबऱ्या जन्माला आल्या नाहीत, तर श्रमिकांच्या वेदना, अन्यायाविरोधातील संघर्ष आणि स्वाभिमानाचा आवाजही बुलंद झाला.
मुंबईच्या गिरणगावातील कामगारांचे जीवन त्यांनी अत्यंत जवळून अनुभवले. गिरणी कामगारांचे कष्ट, चाळ संस्कृती, झोपडपट्ट्यांतील जीवन आणि मराठी माणसाचा स्वाभिमान त्यांनी आपल्या साहित्य आणि पोवाड्यांतून जिवंत केला. मुंबई ही केवळ उद्योगपतींची नगरी नसून लाखो श्रमिकांच्या घामावर उभी राहिलेली कर्मभूमी आहे, असे अण्णाभाऊ साठे यांनी ठणकावून सांगितले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोलाचे होते. त्यांच्या शाहिरीने आणि जनजागृतीपर पोवाड्यांनी मराठी अस्मिता, भाषिक राज्याची मागणी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी ऊर्जा दिली. कामगार, शेतकरी आणि सामान्य जनतेला संघटित करून संघर्षाची प्रेरणा देण्याचे कार्य अण्णाभाऊ यांनी केल्याची भावना नखाते यांनी व्यक्त केली.

