
नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद; स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर परिसरासाठी प्रशासनाची यंत्रणा रस्त्यावर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त ठेवण्याच्या उद्देशाने नगरसेविका सारिका विशाल मासुळकर यांच्या पुढाकारातून परिसरातील झाडांच्या धोकादायक फांद्या, पालापाचोळा, ग्रीन वेस्ट आणि साचलेला कचरा हटविण्याची विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यालगत साचलेला कचरा व झाडांच्या फांद्या हटवून परिसर स्वच्छ केला.
परिसरात काही दिवसांपासून झाडांच्या फांद्या, पालापाचोळा आणि इतर हिरवा कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने नागरिकांना वाहतुकीसह स्वच्छतेच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात अशा कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती, दुर्गंधी तसेच अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला पडलेल्या झाडांच्या फांद्या, ग्रीन वेस्ट आणि इतर कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित झाला असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
यावेळी नगरसेविका सारिका विशाल मासुळकर म्हणाल्या, “नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य देत परिसरातील झाडांच्या फांद्या, पालापाचोळा व ग्रीन वेस्ट हटविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. स्वच्छ आणि सुरक्षित परिसर राखणे ही माझी कायमची बांधिलकी असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढेही तत्पर राहणार आहे.”
स्थानिक नागरिकांनीही या स्वच्छता मोहिमेबद्दल समाधान व्यक्त करत अशा प्रकारची नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही ओला-सुका कचरा वेगळा करून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
