
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन, संबंधित ठेकेदार, वेस्ट-टू-एनर्जी (WTE) कंपनी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत कठोर कारवाईची मागणी केली. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
रोहित पवार यांनी मोशी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना संबंधित ठेकेदाराकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. याशिवाय पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यासह संबंधित संस्थेचे संचालक आणि वेस्ट-टू-एनर्जी कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांच्यावर आमदार महेश लांडगे यांचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यातील हलगर्जीपणावर बोट ठेवत रोहित पवार म्हणाले, “कुदळवाडीतील कारवाईसाठी शेकडो जेसीबी आणि यंत्रसामग्री उपलब्ध होती. मात्र मोशीतील कचरा हटवण्यासाठी आवश्यक मशिनरी महापालिकेकडे नव्हती. ती पुण्यातून मागवावी लागली आणि त्यामुळे तब्बल ३६ तासांचा विलंब झाला. आवश्यक यंत्रसामग्री वेळेत उपलब्ध असती, तर काही निष्पापांचे जीव वाचू शकले असते.”
मृतांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी, मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आणि राहण्यासाठी घर देण्याची मागणीही त्यांनी केली.
महापालिका प्रशासन ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत रोहित पवार म्हणाले, “या दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू देणार नाही.”
