Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड सोशल क्लब आणि क्वालिटी डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७व्या स्वरसागर संगीत महोत्सवाची सुरुवात नुपूर नृत्यालय प्रस्तुत ‘नृत्यगाथा’ या कथक नृत्याविष्काराने अत्यंत दिमाखात झाली. भक्ती, शक्ती आणि संस्कृती या भारतीय परंपरेच्या त्रिवेणीचा अप्रतिम संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे २७ व २८ जुलै रोजी आयोजित महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. नुपूर नृत्यालयाच्या संचालिका डॉ. सुमेधा गाडेकर यांनी सादर केलेल्या प्रभावी देवीस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिष्यांसह त्यांनी सादर केलेल्या ताल पंचम सावरी या सादरीकरणाला भरभरून दाद मिळाली.

आधुनिकता आणि परंपरेचा सुरेख मिलाफ घडवणाऱ्या तराना फ्युजन या नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. गणेश पंचायतन तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान भेटीचा ऐतिहासिक प्रसंग कथक नृत्यनाटिकेतून प्रभावीपणे उभा करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता ‘पांडुरंगा विठ्ठला… श्रीरंगा विठ्ठला’ या भक्तिरसपूर्ण सादरीकरणाने झाली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंजिरी भाके यांनी सूत्रसंचालन केले.

यानंतर झालेल्या उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळ्यास विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे, अनिल गालींदे, डॉ. रवींद्र घांगुर्डे, प्रसिद्ध गायिका सावनी घांगुर्डे, विदुषी सानिया पाटणकर, क्वालिटी डेव्हलपर्सचे संकेत तुपे, हंबीर आवटे, तानाजी थिगळे, मल्लाप्पा कस्तुरे, अभिजीत कोळपे, जवाहर कोटवाणी, राकेश श्रीवास्तव, जयदीप खापरे, शिरीष कुंभार, सुरेखा कुलकर्णी, अस्मिता सावंत, गजानन चिंचवडे, मोहन लोंढे, मृगेश नटराजन, राजीव तांबे, संजय कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार आणि मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविकात स्वरसागर महोत्सवाचा प्रवास, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान, पुरस्कारांची परंपरा, रसिकांचा वाढता प्रतिसाद आणि महोत्सवाच्या सातत्यपूर्ण वाटचालीचा आढावा घेतला. महापालिकेचे सहकार्य संपल्यानंतरही रसिकांच्या प्रेमामुळे हा महोत्सव अविरत सुरू राहिल्याचे त्यांनी सांगताच सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले.

यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘स्वरसागर पुरस्कार’ ज्येष्ठ तबला आणि सतारवादक पंडित नयन घोष यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि ₹२५,००० रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यापूर्वी संजय कांबळे यांनी पं. नयन घोष यांच्या कार्याचा प्रभावी परिचय करून देणारे मानपत्र वाचले.

मनोगतात पं. नयन घोष यांनी आपले वडील पद्मभूषण पं. निखिल घोष यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच विख्यात बासरीवादक पन्नालाल घोष यांच्या कार्याचीही आठवण करून दिली. संगीत कलाभारती संस्थेमार्फत गेल्या सात दशकांपासून नवोदित कलाकार घडविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आजही देश-विदेशात तबला आणि सतारवादनाचे कार्यक्रम सादर करत असल्याचे नमूद करत संगीत हा आयुष्यभर आनंद देणारा प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले. स्वरसागर परिवाराने दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
आभार प्रदर्शन करताना आमदार उमा खापरे यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रभावी मनोगत व्यक्त केले. पं. नयन घोष यांचा सन्मान हा पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रवीण तुपे यांनी स्वखर्चाने आणि निस्वार्थ भावनेतून गेली अनेक वर्षे हा सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवला असून शहराच्या सांस्कृतिक चळवळीत त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यांच्या भाषणालाही उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत कोळपे यांनी केले. मानपत्राचे वाचन संजय कांबळे यांनी केले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दर्जेदार नृत्य, संगीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे स्वरसागर महोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले असून पुढील कार्यक्रमांविषयी रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version