Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील श्री एस. बी. चौधरी हायस्कूलचे कलाशिक्षक राजू साळी यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधत आपल्या कुंचल्यातून विठ्ठलभक्ती, श्रद्धा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम घडवणारी आकर्षक पेंटिंग साकारली आहे. त्यांच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत असून ती वारकरी परंपरेतील भक्तिभावाचे प्रभावी चित्रण करणारी ठरत आहे.

या चित्रात पंढरपूरच्या दिशेने सायकलवरून प्रवास करणारा एक दिव्यांग वारकरी दाखविण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या भाविकाच्या डोक्यावर साक्षात विठुरायाची पाषाणमूर्ती विराजमान असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. शारीरिक अडचणी असूनही विठ्ठलावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि पंढरीची ओढ या भावनांचे अत्यंत प्रभावी दर्शन या चित्रातून घडते.

राजू साळी यांनी या चित्राद्वारे केवळ वारकरी संप्रदायाचा भक्तिभावच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या वतीने मुबलक पावसासाठी विठुरायाकडे प्रार्थना व्यक्त केली आहे. दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन “सर्वदूर चांगला पाऊस पडावा, शेतशिवार हिरवेगार व्हावेत आणि जनजीवन सुखी व्हावे,” हा संदेश त्यांनी आपल्या कलाकृतीतून दिला आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भक्ती, कला आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर मिलाफ घडविणाऱ्या या पेंटिंगचे नागरिक, वारकरी आणि कला रसिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. राजू साळी यांच्या या कल्पक कलाकृतीने विठ्ठलभक्तीचा संदेश अधिक प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचवला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version