
पंढरपूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात साजरा होत आहे. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…, अशा जयघोषात पंढरपुरी नगरी दुमदुमली आहे. विठ्ठलनामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची (ASHADI EKADASHI) शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM DEVENDRA FADNVIS )आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (AMRUTA FADNVIS ) यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने व प्रभावती बाबासाहेब माने या गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव ) यांना महापुजेचा मान मिळाला.
आषाढी एकादशीनिमित्त आज मध्यरात्री ३.०५ वाजताच्या सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली. या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला. यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरु होती. त्यासोबतच व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
या पूजेसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच खुलले होते. राज्यभरातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गांवर अलोट गर्दी केली आहे. या सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागल्याचे पाहायला मिळत होते. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जि.प. सीईओ कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्ष प्रणिता भालके आदी उपस्थित होते.
