
‘भारत टॅक्सी’मध्ये टू-व्हीलर टॅक्सीला विरोध; चालक संघटनांना विश्वासात घेऊन बैठक घेणार – मुरलीधर मोहोळ
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘भारत टॅक्सी’ मोबाईल अॅपमध्ये टू-व्हीलर टॅक्सीचा समावेश करण्यास महाराष्ट्रातील ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालक-मालक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला असून, या विषयावर सर्व संबंधित संघटनांना विश्वासात घेऊन लवकरच व्यापक बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष तथा ऑटो-टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी ‘भारत टॅक्सी’ अॅपमध्ये टू-व्हीलर टॅक्सीला विरोध करणारे निवेदन त्यांना देण्यात आले.
या बैठकीत मुरलीधर मोहोळ यांनी संबंधित अधिकारी आणि सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेऊन पुण्यात लवकरच सर्वसमावेशक बैठक घेण्यात येईल आणि चालक-मालकांचे प्रश्न चर्चेतून सोडवले जातील, असे स्पष्ट आश्वासन दिले.
यावेळी डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, ‘भारत टॅक्सी’ उपक्रमाचे चालक संघटना स्वागत करतात. मात्र, त्यामध्ये टू-व्हीलर टॅक्सीचा समावेश झाल्यास राज्यातील सुमारे ३० लाख ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या रोजगारावर परिणाम होईल. त्यामुळे या निर्णयाला संघटनांचा कायम आणि प्रखर विरोध राहणार आहे.
डॉ. कांबळे यांनी नवी मुंबई येथे झालेल्या ‘भारत टॅक्सी’च्या उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रमुख चालक संघटनांना विश्वासात न घेता किंवा निमंत्रण न देता कार्यक्रम पार पडल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. सरकारने चालकांच्या हितासाठी सुरू केलेल्या या उपक्रमात चालक संघटनांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, सचिव अविनाश वाडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
