
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडगाव, केशवनगर, तानाजीनगर आणि परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
मधुकर बच्चे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरात किरकोळ तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असला तरी योग्य नियोजनाच्या अभावामुळे तो पुन्हा सुरू करण्यासाठी चार, पाच, सहा आणि काही वेळा तब्बल आठ तासांचा विलंब होत आहे. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक तसेच विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वीजपुरवठा पूर्ववत करण्यास उशीर होण्यामागे खाजगी एजन्सी वेळेत उपलब्ध न होणे, केबल टेस्टिंग वाहन वेळेवर न मिळणे आदी कारणे दिली जातात. मात्र, या बाबींचे योग्य नियोजन करणे ही महावितरणच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे बच्चे यांनी नमूद केले.
परिसरातील अनेक देखभाल व दुरुस्तीची कामे खाजगी एजन्सींमार्फत केली जात असल्याने, त्या एजन्सी मनमानी करत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार थांबवून नागरिकांना सुरळीत सेवा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या तीव्र रोषाला महावितरणच्या अधिकाऱ्यांनाच सामोरे जावे लागेल, असा इशाराही मधुकर बच्चे यांनी दिला आहे.

