
मोहननगर, कासारवाडी, रामनगर, देहूरोडसह विविध भागांतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न; तातडीने कारवाईची मागणी
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १४ मधील विविध भागांमध्ये रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्या वीजवाहिन्यांना स्पर्श करत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित झाडांची तातडीने छाटणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अरुणा गणेश लंगोटे , वैशाली काळभोर आणि नगरसेवक प्रमोद कुंभार कुटे यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात मोहननगर, कासारवाडी, रामनगर, देहूरोड, विश्वकर्मानगर, विवेकनगर, गायत्रीनगर, साईबाबानगर, यशस्वीनगर, कॉलनी परिसर आदी भागांमध्ये झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. या फांद्या वीजवाहिन्यांच्या संपर्कात येत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच शॉर्टसर्किट, ठिणग्या पडणे आणि अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे हा धोका आणखी वाढत असल्याने महावितरणने तातडीने संयुक्त पाहणी करून धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच, परिसरातील नागरिकांच्या जीवित आणि वित्तहानीचा धोका टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
या निवेदनाची प्रत महावितरणच्या भोसरी विभाग कार्यालयात स्वीकारण्यात आली असून, लवकरच आवश्यक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
