Spread the love

पीसीयूमध्ये आयएम३–२०२६ परिषदेचा समारोप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या साहाय्याने स्वच्छ ऊर्जा निर्मिती शक्य आहे. पेरोव्ह्स्काइट ऊर्जा रूपांतरण आणि प्लाझ्मा आधारित सीओ २ उपयोगीकरण यावरील संशोधन भविष्य काळातील आपली ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत राईस विद्यापीठ, अमेरिका येथील केमिकल अँड बायोमॉलिक्युलर इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. आदित्य मोहिते यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे आयोजित “आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड मीट ऑन मल्टिडिसिप्लिनरी रिसर्च अँड इनोव्हेशन फॉर विकसित भारत – आयएम३–२०२६” या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात जागतिक दर्जाच्या संशोधक, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ आणि विविध देशांतील प्रतिनिधींनी उत्साहात सहभाग घेतला.
समारोप सत्रात पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी आयएम३- २०२६ ही पीसीयूची पहिली आंतरराष्ट्रीय बहुविषयक संशोधन परिषद असल्याचा अभिमान व्यक्त केला. संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी विद्यापीठाकडून डिजिटेक उपक्रमासाठी १० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पीसीयूचे संशोधन व विकास संचालक तथा आयएम३–२०२६चे अध्यक्ष डॉ. भारत काळे यांनी ऊर्जा निर्मिती व ऊर्जा साठवण क्षेत्रातील प्रगत पदार्थ आणि भविष्यातील संशोधनाच्या संधींवर मार्गदर्शन केले. बहुविषयक संशोधनातून विकसित भारतासाठी शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ यूटा येथील मटेरियल्स सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. आशुतोष तिवारी, पीसीयूचे संशोधन, विकास संचालक व परिषद अध्यक्ष डॉ. भारत काळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खारचे, आयर्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकचे डॉ. नानासाहेब थोरात, नॉर्वेतील युनिव्हर्सिटी ऑफ स्टाव्हेंजरचे डॉ. सचिन चव्हाण, ख्राइस्ट (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी), दिल्ली एनसीआर येथील डॉ. कमल उप्रेती, आयआयटी मंडीचे डॉ. आदित्य निगम, सीएसआयआर सीडीआरआय, लखनौचे डॉ. आसिफ अली, मायनिंगब्रिजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी शर्मा, कोलकाता येथील डॉ. अमिताव पत्रा यांनी मार्गदर्शन केले.
या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत पदार्थविज्ञान, स्वच्छ ऊर्जा, हवामान बदल, आरोग्य, कृषी आणि शाश्वत विकास, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, डेटा आधारित कृषी व्यवस्थापन आणि आधुनिक शेतीतील तांत्रिक बदल, एआय आधारित नॅनोमेडिसिनद्वारे कर्करोग निदान आणि उपचारातील नव्या संधी, मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स आणि प्रगत पदार्थ, नैसर्गिक स्रोतांमधून औषध शोध प्रक्रियेत एआयची भूमिका, खाण उद्योगातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर, नैसर्गिक प्रकाश संकलन प्रणालीवर आधारित नव्या पिढीतील ऊर्जा तंत्रज्ञान, हवामान बदल, हरितगृह वायू, एरोसोल-मेघ परस्परसंवाद आणि तीव्र हवामान घटनांचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम या विषयांवर सखोल चर्चा झाली.

यामध्ये स्लोव्हेनियातील युनिव्हर्सिटी ऑफ नोव्हा गोरिका येथील डॉ. व्हॅलंट मॅटियाझ, दक्षिण आफ्रिका विद्यापीठाचे डॉ. टी. एस. महुले, आयआयटी मद्रास येथील प्रा. सचिन एस. गुंठे, दक्षिण आफ्रिका विद्यापीठाच्या डॉ. विजया श्रीनिवासु वल्लभपुरापू, भुवनेश्वरचे डॉ. एस. के. एस. पराशर, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, बार्कचे डॉ. अनिल कुमार पॅबी, रशियन सेंटर ऑफ सायन्स अँड कल्चरचे संचालक डॉ. व्हिक्टर गोरेल्यख, डॉ. संतोष देशमुख यांनी सहभाग घेतला.

बेस्ट स्पॉन्सर पुरस्कार रुतुराज आणि राहुल पाटील यांना प्रदान करण्यात आला. तर बेस्ट पेपर पुरस्कार ट्रॅक १ (कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग) मध्ये तेजल देशपांडे, ट्रॅक २ व ३ (कॉम्प्युटेशनल मॉडेलिंग, मटेरियल डिझाइन, प्रोसेसिंग अँड डिव्हाइसेस) मध्ये हरमनप्रीत कौर आणि ट्रॅक ४ (इकोसिस्टम, रिसायकलिंग अँड सिस्टीम इंजिनिअरिंग) मध्ये प्रीती काळे यांना प्रदान करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version