Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण शहरात ‘स्वच्छता सप्ताह’ आयोजित करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात भोईर यांनी म्हटले आहे की, स्व. अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून त्यांची जयंती शहरासाठी प्रेरणादायी ठरावी. पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही २२ ते २८ जुलै या कालावधीत स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात यावा.

या अभियानांतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात नालेसफाई, ड्रेनेज लाईनमधील अडथळे दूर करणे, ओला व सुका कचरा संकलन, राडारोडा उचलणे, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी, रस्त्यांवरील फिकट झालेल्या मार्किंगची रंगरंगोटी तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर निश्चित करून संपूर्ण आठवडाभर विशेष स्वच्छता अभियान राबवावे, जेणेकरून शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनेल, असेही भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शहरभर स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करावे, अशी अपेक्षाही भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version