
जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावावा यासाठी जनजागृती सुरू – कुणाल साठे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जंजीरा किल्ल्यावर सरकारने सन्मानाने भगवा झेंडा लावावा त्याची कायम रक्षण, देखभाल करण्याची जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या वतीने घेण्यात येईल. तसेच पुढील तीन महिन्यात येथे भगवा झेंडा सरकारने लावला पाहिजे, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या कडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्फत परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारने तीन महिन्यात परवानगी द्यावी अन्यथा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी दिला.
सोमवारी, पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष कुणाल साठे, राज्य संपर्क प्रमुख गौरव शेवाळे, गणेश राजपूत आदी उपस्थित होते.
डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले की, मंत्री निलेश राणे यांच्याकडे संस्थेच्या वतीने मागणी केली आहे की, जंजीरा किल्ल्यावर ज्या प्रमाणे जाण्यायेण्यासाठी जेट्टी बांधली आहे तशी जेट्टी पद्मदुर्ग किल्ल्यावर सरकारने बांधावी. यामुळे येथे दळणवळण वाढेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल.
कुणाल साठे यांनी सांगितले की, २०१६ मध्ये संस्थेच्या वतीने ३०० किल्ल्यांवर एकाच वेळी भगवा झेंडा फडकवला, परंतु जंजीरा किल्ल्यावर तेथील अल्पसंख्यांक समाजाने विरोध केला. त्यानंतर आमच्या संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यात जंजीरा किल्ल्यावर सरकारने सन्मानाने भगवा झेंडा लावावा अन्यथा संस्थेच्या वतीने हजारो दुर्गप्रेमी एकत्र येऊन तेथे भगवा झेंडा फडकवतील. यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती कुणाल साठे यांनी दिली.
