Spread the love

गवळीमाथा व फुगेवाडी (दापोडी) येथील यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर शहरभर उपक्रम राबविण्याचे निर्देश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथे महिला बचत गटांच्या सक्रिय सहभागातून ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रत्येकी एका झोपडपट्टीची निवड करून तेथे १५ ऑगस्टपर्यंत ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण, ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, घरगुती कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, परिसराची स्वच्छता तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमात महिला बचत गट, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याचे सुरक्षित, विकेंद्रित आणि शाश्वत व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ उपक्रमामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास, उगमस्थानी वर्गीकरणाला चालना मिळण्यास तसेच परिसर अधिक स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.

यासाठी गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथील यशस्वी प्रकल्पाचा अभ्यास करून त्याच धर्तीवर आपल्या हद्दीतील योग्य झोपडपट्टीची निवड करावी आणि योग्य नियोजन करून १५ ऑगस्टपूर्वी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावेत, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम तसेच उप आयुक्त डाॅ.प्रदीप ठेंगल यांना दिले आहेत.

महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरात कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version