Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड परिसरातील कस्तुरी चौक आणि विनोदे चौक येथे दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी, सर्रास सुरू असलेली राँग साईड वाहतूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचा संयम संपत चालला आहे. या गंभीर प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल शंकर वाकडकर यांनी हिंजवडी वाहतूक विभागाकडे निवेदन देत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली असून, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

कस्तुरी चौक आणि विनोदे चौक हे हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे चौक आहेत. दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र सकाळी, दुपारी आणि सायंकाळी या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना तासन्तास रस्त्यावर अडकून राहावे लागत आहे.

या परिसरात युरो स्कूलसह अनेक शैक्षणिक संस्था असल्यामुळे शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर बनते. शालेय विद्यार्थी, पालक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याहून धक्कादायक बाब म्हणजे अनेक वाहनचालकांकडून सर्रास राँग साईडने वाहन चालविले जात असून टँकर, ट्रक आणि इतर अवजड वाहनेही वाहतूक नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

प्रमुख मागण्या

– कस्तुरी चौक व विनोदे चौक येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करावेत.
– राँग साईडने वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक कारवाई करावी.
– शाळांच्या वेळेत विशेष वाहतूक नियोजन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.
– आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक, नो-एंट्री व वन-वे नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी.
– गर्दीच्या वेळेत विशेष वाहतूक पथक तैनात करून वाहतूक सुरळीत ठेवावी.

विशाल वाकडकर म्हणाले की, “प्रशासनाने एखाद्या निष्पाप नागरिकाचा किंवा विद्यार्थ्याचा बळी गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा त्यापूर्वीच ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ही परिस्थिती आता सहन केली जाणार नाही. तात्काळ प्रभावी उपाययोजना न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल.”

वाकड परिसरातील नागरिकांनीही या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version