Spread the love

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी घेतली संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील घनकचरा व्यवस्थापन विकेंद्रित करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला महापालिकेने गती दिली आहे. या केंद्रांसाठी योग्य जागांची तातडीने निश्चिती करून अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारणीचे नियोजन करण्याचे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना दिले आहेत.

महापालिका सभेत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांची प्राथमिक बैठक घेतली. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील उपलब्ध जागांचा आढावा घेऊन प्रक्रिया केंद्रासाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची स्थानिक पातळीवर प्रक्रिया करण्यासाठी विकेंद्रित यंत्रणा उभारण्यावर महापालिकेचा भर असून, त्यामुळे मोशी येथील कचरा डेपोवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. जागा निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कचरा प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले जाणार आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जागा निश्चितीचे काम प्राधान्याने पूर्ण करून प्रक्रिया केंद्र उभारणीचा आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version