Spread the love

महावितरण व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

निष्काळजीपणामुळे वीज खंडित झाल्यास गय केली जाणार नाही; ‘समन्वय साधून काम करण्याच्या सूचना

अखंड वीजपुरवठ्यासाठी तातडीने बैठकांचा धडाका

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार पाऊस कोसळला. यावेळी रावेत, किवळे आणि मामुर्डीतील नागरिकांना सलग ४८ तास अंधारात राहावे लागले होते. इतका वेळ वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले , सोसायट्यांमधील पाणी उपसा बंद पडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. नागरिकांच्या या अतोनात हाल आणि त्रासाची गंभीर दखल घेत चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महावितरण आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने गुरुवारी संयुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत, ठरवून दिलेल्या उपाययोजनांची सक्त अंमलबजावणी करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला. रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरात तब्बल ४८ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. महापालिका किंवा खासगी कंत्राटदार रस्त्यांवर केल्या जाणाऱ्या मनमानी खोदाईदरम्यान महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. या निष्काळजीपणामुळेच वीज पुरवठा खंडित झाल्याचे बैठकीत उघड झाले.

आमदार शंकर जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालय झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, कुणाल वाव्हळकर, रावेत-वाल्हेकरवाडी अध्यक्ष मोहन राऊत, श्रीकांत भोंडवे, दीपक भोंडवे यांच्यासह महावितरणचे उपअभियंता रत्नदीप काळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी, अधीक्षक अभियंता श्रीयुत. मुंडे, तसेच श्रीयुत . लहाने, सुरेश गवारे आणि आशुतोष थोरात आदी उपस्थित होते.

समन्वयाशिवाय खोदाई न करण्याचे कडक निर्देश

या बेजबाबदार कारभाराची आमदार शंकर जगताप यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “भविष्यात कोणत्याही विभागाने महावितरणशी परस्पर समन्वय साधल्याशिवाय खोदाईची कामे करू नयेत. तसेच, परिसरातील धोकादायक डीपींची तातडीने पाहणी करून त्या दुरुस्त कराव्यात.” नागरिकांना पुन्हा अशा भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, यासाठी सांगितलेल्या सर्व उपाययोजनांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

गहुंजे येथे उपकेंद्र उभारणार

भविष्यात या भागातील विजेची वाढती मागणी आणि अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे नियोजन करण्यात आले आहे. गहुंजे येथे (२२०/२२ केव्ही, ३०० MVA )क्षमतेचे नवीन महापारेषण उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील वीज यंत्रणा अधिक सक्षम होईल. या विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून, पुढील आठवड्यात महापारेषण आणि सर्व संबंधित विभागांची एक संयुक्त बैठक घेऊन या कामाला गती दिली जाणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version