Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या दुर्घटनेसाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष जबाबदार असल्याचा आरोप करत मोशी परिसरातील नगरसेवकांनी “मोशीत आता आणखी कचरा येऊ देणार नाही” असा आक्रमक इशारा दिला. या मुद्द्यावर सभागृहात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली.

सभेच्या प्रारंभी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी केली.
भाजपचे उत्तम केंदळे यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली. तर सचिन तापकीर यांनी पुनावळे कचरा डेपोला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनाच या परिस्थितीस जबाबदार धरत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये कचरा व्यवस्थापनाची स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची मागणी केली.
“गेली ३५ वर्षे मोशीच शहराचा कचरा सहन करत आहे. मोशीने संपूर्ण शहराचा ठेका घेतलाय का?” असा संतप्त सवाल नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी उपस्थित केला. पुनावळेतील कचरा डेपोचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करत त्यांनी आवश्यक असल्यास पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्याची भूमिकाही मांडली.

अर्चना सस्ते यांनी “मोशीत जनावरे नाहीत, माणसं राहतात” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी कचरा वर्गीकरण, प्लास्टिक बंदी आणि डेपो हटविण्याबाबत प्रशासनाला धारेवर धरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे यांनी केवळ निलंबन नव्हे, तर दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली.
दरम्यान, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या नगरसेवकांनी महापालिका भवनाबाहेर ठिय्या आंदोलन करत प्रवेशद्वारावर कचरा फेकून प्रशासनाचा निषेध नोंदविला. मोशी दुर्घटनेवरून सभागृहासह महापालिका परिसरात दिवसभर वातावरण चांगलेच तापले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version