पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या नोटिशीनंतर वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प चालविणारी अँटोनी लारा रिन्यूएबल कंपनी, पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी आपले खुलासे सादर केले आहेत.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १३ जुलै रोजी संबंधित कंपनी व अधिकाऱ्यांना दुर्घटनेबाबत नोटीस बजावून १४ जुलैपर्यंत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १४ जुलै रोजी सायंकाळी संबंधितांकडून लेखी खुलासे आयुक्तांकडे प्राप्त झाले.
दुर्घटनेची कारणे, जबाबदाऱ्या आणि संबंधित बाबींचा तपशील या खुलाशांमध्ये देण्यात आला असून, त्याची महापालिका प्रशासनाकडून छाननी करण्यात येणार आहे. या छाननीनंतर पुढील प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
