पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून पोलीस आयुक्तांना पत्र देऊन मोशी दुर्घटना प्रकरणी महानगरपालिकेच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी म्हटले आहे, मोशी कचरा डेपो येथे दिनांक 08/07/2026 रोजी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा बळी गेला आहे या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर संबंधित ठेकेदार कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, ही दुर्घटना केवळ ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच नाही, तर महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या पर्यवेक्षकीय अपयशामुळे घडली आहे, हे स्पष्ट होत आहे.
सदर कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची देखरेख, सुरक्षेच्या मानकांचे (Safety Standards) पालन आणि वेळोवेळी होणारे ऑडिट करण्याची प्राथमिक जबाबदारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग आणि संबंधित कार्यकारी अधिकाऱ्यांची होती. ठेकेदारावर कारवाई होत असताना, त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या आणि प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या महापालिकेच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये बजावण्यात कसूर केल्याचे दिसून येते.
त्यामुळे, या दुर्घटनेसाठी ठेकेदाराप्रमाणेच महापालिकेचे पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि संबंधित कार्यकारी अधिकारी देखील तितकेच जबाबदार आहेत. न्याय्य आणि निष्पक्षपाती तपासासाठी,मोशी कचरा डेपो प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्या पर्यावरण विभागाचे प्रमुख आणि संबंधित कार्यकारी अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून, त्यांच्यावर कर्तव्यकसुर आणि मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याप्रकरणी (IPC आणि संबंधित कलमांन्वये) तात्काळ गुन्हे दाखल करावेत. या प्रकल्पाच्या कार्यप्रणालीत आणि सुरक्षेच्या नियमांमध्ये कोणत्या स्तरावर त्रुटी होत्या, याचा तपास करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता, त्यांनाही तपासात मुख्य संशयित म्हणून समाविष्ट करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी.
पिंपरी-चिंचवड शहराच्या नागरिकांच्या आणि मृत कामगारांच्या कुटुंबीयांच्या न्याय हक्कासाठी, या प्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती आम्ही करत आहोत.
आपण या प्रकरणात तातडीने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर एफआयआर (FIR) नोंदवण्याचे निर्देश द्यावेत,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
