Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला सभासद, पदाधिकारी, संचालक आणि माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.

वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने सभासदांसाठी अल्पोपहार व चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. यावेळी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि आगामी काळातील विविध योजनांवर चर्चा करण्यात आली.

या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रथम नागरिक तथा महापौर योगिता लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी शिवाजी शेवाळे (चेअरमन), ज्ञानेश्वर शिंदे (व्हाइस चेअरमन), विश्वनाथ जाधव (सेक्रेटरी), अभिषेक पुणे (खजिनदार) यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य, सल्लागार, माजी चेअरमन, निवृत्त कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त सभासदांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या ५४ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करत सभासदांनी संस्थेच्या भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

संस्थेच्या वतीने सर्व सभासदांचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले असून, भविष्यातही सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version