पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ९ व्यक्तींच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपये मदत निधी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करा, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. घटना घडल्यानंतर लागलीच पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
या दुर्घटनेत भावेश वाणी (वय ३३), अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) तसेच राहुल गायकवाड (वय २३, मोशी), वामन कसबे (वय ५०, मोशी) अशा ९ जणांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाखांची मदत देण्यात येणार आहे. ही मदत देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
