Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीने वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला. महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा, औषधांचे वाटप आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

वारीदरम्यान दीर्घ पायी प्रवास, अधूनमधून होणारा पाऊस, मुक्कामस्थळी बदलणारे पाणी तसेच हवामानातील बदल यांमुळे वारकऱ्यांना जुलाब, उलटी, अंगदुखी, सर्दी, ताप आदी किरकोळ आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आवश्यक ओटीसी (ओव्हर-द-काउंटर) औषधांचे मोफत वाटप केले. यासोबतच औषधांचा योग्य वापर, घ्यावयाची खबरदारी आणि आरोग्यविषयक समुपदेशनही करण्यात आले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी धीरज सुराणा, युगल ओसवाल आणि प्रतीक चुत्तर यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपत आवश्यक ओटीसी औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होत केवळ कुशल फार्मासिस्टच नव्हे, तर संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी केले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मुकेश मोहिते, प्रा. पवनकुमार वानखडे, प्रा. शुभांगी दसवडकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व सोनवणे, कृष्णा म्हसे, वेदांग जाधव, शार्दुल ढमाले आणि सानिका सांगवे यांनी विशेष परिश्रम घेतले. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (नि.), विश्वस्त तेजस पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून सहभागी सर्वांचे अभिनंदन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version