पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संबंधित ठेकेदार कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरील काही कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना संबंधित यंत्रणा व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसने मृत कामगारांच्या वारसांना आणि गंभीर जखमी कामगारांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी केली आहे. तसेच पर्यावरण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यकसुरीबद्दल कारवाई करावी आणि ठेकेदार कंपनी अँथोनी लारा विरोधात सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन व निष्काळजीपणाप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरील आतापर्यंतचा खर्च, निविदा प्रक्रिया आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांची तज्ज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
