Spread the love

महापालिकेकडून वारकऱ्यांसाठी व्यापक सुविधा; प्रत्येक दिंडीला आरोग्य किटचे वितरण, दिंडी प्रमुख व वीणेकरांचा सन्मान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज सकाळी पिंपरी-चिंचवड नगरीत आगमन झाले,महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांनी त्यांच्या पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.

यावेळी आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी,उपमहापौर शर्मिला बाबर,अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,तृप्ती सांडभोर,महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे,नगरसदस्य निखिल बो-हाडे,सचिन तापकीर, जालिंदर शिंदे,सागर गवळी, नगरसदस्या योगिता नागरगोजे, सोनाली गव्हाणे,अर्चना सस्ते,कविता भोंगाळे,उप आयुक्त अण्णा बोदडे,डाॅ.प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे,अजिंक्य येळे, डाॅ.शिवाजी ढगे,डाॅ.ॠतुजा लोखंडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

मॅगझिन चौक परिसरात “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले. पालखी मार्गावर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माऊलींचे दर्शन घेतले. या मंगलमय वातावरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी पालखीसोबत असलेल्या प्रत्येक दिंडीला महापालिकेतर्फे आरोग्य किट (प्रथमोपचार पेटी) चे वितरण करण्यात आले. तसेच दिंडी प्रमुखांचा, वीणेकरांचा देशी बियाणांचे पाकीट देऊन सत्कार करून वारकरी परंपरेतील त्यांच्या सेवेला कृतज्ञतापूर्वक गौरविण्यात आले.

मान्यवरांनी पालखी मार्गावरील विविध सुविधा व व्यवस्थेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी महापालिकेने आरोग्य तपासणी केंद्रे, रुग्णवाहिका सेवा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता मोहीम, तात्पुरती स्वच्छतागृहे, मुक्कामाची सुविधा, प्रकाशयोजना, अग्निसुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा तसेच वाहतूक व्यवस्थापनाचे व्यापक नियोजन केले आहे.

यावेळी आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांनी स्वतः ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष टाळ-मृदुंग वादन केले आणि फेर देखील धरला.

समता, सेवा, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या पवित्र पालखी सोहळ्याने पिंपरी-चिंचवड नगरी पुन्हा एकदा भक्तिमय झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version